Thursday, November 28, 2013

बाप ....

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,
एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्‍या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्‍या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन्‌ सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,
चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,
जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्‍वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

Saturday, July 6, 2013

पहिलं प्रेम कसं विसरायचं ?

तुझाकडे पूर्णदिवस नाही मागत मी
फक्त त्यातील काहीक्षण दे ..........
आलीस तरी तुझ्याआठवणीना तरी
यायला वाव दे...

माझ्यास्वप्नातल्या गावात आपलएक घर होत
आणि ते तूच सजवलस
आज माझ्या स्वप्नातलं गावतसच आहे,
त्यातल घरही तसच आहे
पण .... पण...

फक्त नाहीस ती तू
तुझी आठवणच फक्त माझी उरली आहे.....
त्या आठवणीतच तू माझी आहेस ....
आजही वाट पाहतो तू परत येण्याची त्या गावाच्या वेशीवर
कारण त्या घराची राणी फक्त तू आहेस ......




Thursday, August 23, 2012

प्रेम प्रेम प्रेम

नेहमीच विचारायची ती मला
का प्रेम करतो तू एवढं
सागराच्या खोली एवढं
का ओढून घेतो मला
सागराच्या लाटा एवढं

नेहमीच सांगायची ती मला

हिप्नोटाइज करतोस तू मला
स्वप्नातही माझ्या
फक्त तूच का दिसतो मला

वाटायच सांगाव तिला

अग वेडे
प्रेम काय सांगून केले जाते
बुडायला काय पाणीच लागतं
अथांग काय फक्त सागरच असतो
अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर 
चंद्रही भारावतो ह्या लाटाना
म्हणूनच त्याही उफाणतात
पोर्णिमा आणि अमावस्येला

प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत  

तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो
तुझ्या असण्यातच आता माझं असण असते
म्हणूच सांगतो
माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत 

Monday, April 23, 2012

तुझी आठवण !

ही अखेरची तुझी आठवण !

यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार नाही....

... यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं
माझ्या मनात बरसणार नाही....

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस माझ्यामनाच्या अंगणात
रिमझिमणार नाही....!

तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा
जसा स्वीकारला होता
तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर...!

म्हणूनच हे अखेरचे काही अश्रू,
फक्त तुझ्यासाठी....
पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली
तुझ्यासाठी जमणार नाहीत.......

आणि हे अखेरचे काही शब्द
फक्त तुझ्यासाठी.....
यापुढे माझ्या कविता
तुझ्या आठवणी मागणार नाहीत....

यापुढे कधीही माझ्या कविता
तुझ्यासाठी असणार नाहीत....

ही अखेरची तुझी आठवण....
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार नाही.

Friday, March 16, 2012

अजुनी तशीच मी

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप बोलावसं वाटत,
नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत…
तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुलाच पाहावस वाटत,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावस
वाटत…
तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप हसावसं वाटत,
नाहीतर उदास रहावस वाटत…
तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,
नाहीतर मनात सगळं दुखं, दाबून
ठेवावस वाटत…
तू बरोबर असतोस तेव्हा,
तुझ्याबरोबर पावसात भिजावस
वाटत,
नाहीतर खिडकीतूनच, पडता पाऊस
पाहावस वाटत…
तू बरोबर असतोस तेव्हा,
जगावसं वाटत,
नाहीतर जग सोडून जावस वाटत…
तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,
नाहीतर फक्त तुलाच आठवावस
वाटत…
नाहीतर फक्त तुलाच आठवावस
वाटत…

Tuesday, March 6, 2012